Saturday, Jan 20th

Headlines:

दहशतवाद्यांना फाशी न देता त्यांना आजीवन कारागृहात डांबावे : माजी मंत्री शशी थरुर

तिरुअनंतपुरम/कोची  - मुंबईतील साखळी बॉंबस्फोटातील एक आरोपी याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर त्याला फाशी देणे योग्य की अयोग्य, याबाबत वाक्‌युद्ध सुरू आहे. कॉंग्रेसचे माजी मंत्री शशी थरूर यांनीही दहशतवाद्यांना फाशी देण्यास आपला विरोध असून, त्यांना कधीच पॅरोल न देता आजीवन कारागृहात डांबावे, असे म्हटले आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनीही थरूर यांच्या सुरात सूर मिसळला आहे. दहशतवाद्यांना फाशी देऊ नये, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे.
‘ट्री वॉक‘ पर्यावरण संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात थरूर बोलत होते. ते म्हणाले, एखाद्या गुन्हेगाराने जर खून केला असेल तर त्याला फाशी दिली जात नाही. तर त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. याकूबच्या फाशीसंदर्भात मी जे ट्विट केले होते त्यावरून प्रचंड टीका झाली होती. मात्र, याकूबला शिक्षा देण्यास माझा कधीच विरोध नव्हता; तर मी फाशीविरोधात माझे मत मांडले होते. कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देऊ नये, असे आजही माझे मत आहे. केवळ मीच नव्हे तर भाजपचे खासदार वरुण गांधी, शत्रुघ्न सिन्हा, डी. राजा, सीताराम येचुरी, द्रमुकच्या कनिमोळी आदी नेत्यांनीही फाशीच्या शिक्षेस विरोध दर्शविला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.