Saturday, Jan 20th

Headlines:

राम मंदिर उभारणीच्या गप्पा मारणं थांबवा : शंकराचार्य

नवी दिल्ली - राम जन्मभूमी, राम मंदिराची उभारणी याबाबत गप्पा मारणं पुरे करा. आमचं आम्हीच राम मंदिर उभारू, तुमच्या मदतीची गरज नाही, असा आक्रमक पवित्रा घेत द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरलंय. राज्यसभेत बहुमत नसल्यानं संसदेत राम मंदिराबाबतचा प्रस्ताव आणणं जरा कठीणच दिसतंय, असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्यानं हिंदू संतमहंत चांगलेच खवळलेत.
दिल्लीच्या रामलीला मैदानावर आयोजित हिंदू धर्म संसदेत शंकराचार्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला. अयोध्या ही रामजन्मभूमीच आहे. या जागेशी बाबरचं नाव राजकीय फायद्यासाठीच जोडण्यात आलंय. बाबर या ठिकाणी कधीही आला नव्हता, हे कोर्टानंही मान्य केलंय. त्यामुळे या खटल्यात आता सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर आल्यास कुठल्याही राजकीय पक्षाच्या मदतीशिवाय आम्ही संतच राम मंदिर उभारू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राम मंदिराबाबत चर्चा करणं तुम्ही सोडून द्या, आम्हाला तुमचा पैसा नको, जनता पैसा देईल आणि आम्ही मंदिर बांधू, असं त्यांनी ठणकावलं.