Tuesday, Jan 23rd

Headlines:

बसवरील गोळीबारात ४७जण ठार

कराची - पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची येथे तीन बाइकवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी ९ मिमि पिस्तुल आणि एके-४७ रायफल अशा शस्त्रांचा वापर करुन इस्मायली समुदायाच्या प्रवासी बसवर गोळीबार केला. या गोळीबारात ४७ जण ठार झाले आहेत. ही घटना डो मेडिकल कॉलेज जवळ सफोरा चौरंगी भागात घडली. गोळीबाराचे कारण अद्याप समजलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जण बाइक चालवत होते आणि अन्य ३ जणांनी बसच्या दिशेने गोळीबार केला. हल्लेखोरांनी गोळीबार करतच बस अडवली आणि बसमध्ये जाऊन तुफान गोळीबार केला. या गोळीबारात १६ महिलांसह ४७ जण ठार झाले. फक्त ४० प्रवाशांची क्षमता असलेली बस ६० पेक्षा जास्त प्रवाशांमुळे खच्चून भरलेली होती. बसमध्ये काही लहान मुलेही होती जी गोळीबारात जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना जवळच्या जीन्ना हॉस्पिटल, आगा खान हॉस्पिटल आणि मेमन हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. गोळीबाराचे स्वरुप पाहता मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.