Tuesday, Jan 23rd

Headlines:

श्री गणेशचतुर्थी

E-mail Print PDF
18-aug_ganesh-chaturthi
श्री गणेशचतुर्थी
कुटुंबात कोणी करावी ?
’गणेशचतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे ’सिद्धिविनायक व्रत’ या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) व पाकनिष्पत्ति (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ति पुजली तरी चालते; पण ज्या वेळी द्रव्यकोश व पाकनिष्पत्ति कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशव्रत करावे.’
महत्त्व
विनाशकारक, तमप्रधान यमलहरी पृथ्वीवर आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या १२० दिवसांत जास्त प्रमाणात येतात. या काळात त्यांची तीव्रता जास्त असते. त्या तीव्रतेच्या काळात, म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत, गणेशलहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येत असल्याने यमलहरींची तीव्रता कमी व्हायला मदत होते.
नवीन मूर्तीचे प्रयोजन
पूजेत गणपति असला तरी गणपतीची नवीन मूर्ति आणण्याचा उद्देश याप्रमाणे आहे - गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ति येईल. जास्त शक्ति असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ति वापरतात व ती मूर्ति नंतर विसर्जित करतात. गणपतीच्या लहरींत सत्त्व, रज व तम यांचे प्रमाण ५:५:५ असे आहे, तर सर्वसाधारण व्यक्तीत १:३:५ असे आहे; म्हणून गणेशलहरी जास्त वेळ ग्रहण करणे सर्वसाधारण व्यक्तीला शक्य नसते.
शास्त्रोक्त विधी व रूढी यांचा अवधि
’भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची सिद्धिविनायक या नावाने प्राणप्रतिष्ठा व पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधि आहे; पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस गणपति ठेवून त्याचा उत्सव करू लागले. बरेच जण (ज्येष्ठा) गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन करतात. एखाद्याच्या कुलाचारात गणपति पाच दिवस असेल व तो त्याला दीड किंवा सात दिवसांचा करावयाचा असला, तर तो तसे करू शकतो. यासाठी अधिकारी व्यक्तीस विचारण्याची जरूरी नाही.
रूढीप्रमाणे पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, सहाव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी गणेशविसर्जन करावे. हौस म्हणून, भजनादि सांस्कृतिक कार्यक्रमांस उत्तेजन देण्याच्या निमित्ताने गणपति एकाहून अधिक दिवस ठेवण्याची प्रथा पडली.
मूर्तीची आसनावर स्थापना
पूजेपूर्वी ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची असते, त्यावर तांदुळ (धान्य) ठेवून त्यावर मूर्ति ठेवतात. आपापल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदुळ किंवा तांदुळाचा लहानसा ढीग करतात. तांदुळावर मूर्ति ठेवण्याचा फायदा प्ाुढीलप्रमाणे होतो. मूर्तीत गणपतीचे आवाहन करून तिची पूजा केल्याने मूर्तीत शक्ति निर्माण होते. त्या शक्तीमुळे तांदुळ भारित होतात. सारख्या कंपनसंख्येच्या दोन तंबोर्‍यांच्या दोन तारा असल्या, तर एकीतून नाद काढल्यास तसा नाद दुसर्‍या तारेतूनही येतो. त्याचप्रमाणे मूर्तीखालील तांदुळात शक्तीमुळे स्पंदने निर्माण झाली की घरातील तांदुळाच्या साठ्यातही शक्तीची स्पंदने निर्माण होतात. अशा तर्‍हेने शक्तीने भारित झालेले तांदुळ वर्षभर प्रसाद म्हणून खाता येतात.
आरत्या हळुवार अन् भावपूर्ण म्हणा !
अनेक ठिकाणी आरत्या चढाओढ करीत, बेंबीच्या देठापासून ओरडून आणि कर्णकर्कश वाद्यांच्या गजरात म्हटल्या जातात. हे टाळून प्रत्येक आरती अर्थ समजून घेऊन योग्य उच्चारांसह म्हणा; त्यामुळे भाव जागृत होतो. आरतीच्या वेळी टाळ्या / वाद्ये हळुवार, तसेच तालबद्ध वाजवा. श्री गणेशाचा अधिकाधिक नामजप करा !
श्री गणेशाचा नामजप का करावा ?
श्रीगणेश प्राणशक्ती वाढविणारा आहे
मनुष्याच्या शरीरातील निरनिराळी कार्ये निरनिराळ्या शक्तींद्वारे होत असतात. त्या निरनिराळ्या शक्तींच्या मूलभूत शक्तीला प्राणशक्ती असे म्हणतात. श्री गणपतीचा नामजप प्राणशक्ती वाढविणारा आहे.
विसर्जन
उत्तरपूजेनंतर मूर्तीचे जलाशयात विसर्जन करतात. विसर्जनाला जातांना गणपतीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक, वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ति शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी.
मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करतात. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच वाहत्या पाण्याबरोबर ही पवित्रके सर्वदूर पोहोचतात व अनेकांना त्यांचा लाभ मिळतो. या पाण्याचे बाष्पीभवनही होत असल्याकारणाने एकंदर वातावरण सात्त्विक होण्यास मदत होते. विसर्जनाच्या वेळी जेथे विसर्जन केले, तेथील माती घरी आणून ती सर्वत्र शिंपडण्याची प्रथा आहे.
सोयर वा सुतक असले तरी पुरोहिताकडून गणेशव्रत आचरले जाणे इष्ट आहे. त्याचप्रमाणे घरातील प्रसूतीची वगैरे वाट न पहाता ठरल्याप्रमाणे विसर्जन करणे हे शास्त्राला धरून आहे.
मूर्तिभंग
प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी वा विसर्जनापूर्वीच्या अक्षता टाकून त्या मूर्तीतील देवत्व गेल्यावर त्या मूर्तीचा अवयव तुटल्यास विचार करण्याचे काहीच कारण नाही. प्राणप्रतिष्ठेपूर्वी अवयव दुखावल्यास दुसरी मूर्ति पुजावी. देवत्व गेल्यावर अवयव दुखावल्यास त्या मूर्तीचे नेहमीप्रमाणे विसर्जन करावे. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अवयव दुखावला, तर त्या मूर्तीवर अक्षता टाकून विसर्जन करावे. जर ही घटना गणेश चतुर्थीच्या दिवशीच घडली, तर दुसरी मूर्ति पुजावी व दुसरे, तिसरे दिवशी घडल्यास नवीन मूर्ति पुजण्याचे काहीच कारण नाही. मूर्ति प्ाूर्णतया भंग पावल्यास कुलपुरोहिताच्या सल्ल्याने यथावकाश ’अद्भुत दर्शन शांति’ करावी. म्हणून वरील उपाय श्रद्धेने करावा.’

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ’गणपति’