Wednesday, Feb 21st

Headlines:

रत्नागिरीच्या सौंदर्याचे मुंबईच्या तरूणाईला वेड!

E-mail Print PDF
par1
par2
 रत्नागिरीतील तिर्थक्षेत्रे, निसर्गसौंदर्य, इथला कोकणी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईतून काही तरूण चक्क रॉयल इनफिल्ड बुलेट दुचाकीने अवतरले. तीन दिवस पाहुणचार घेऊन मुंबईत परतले. आता ते इथली महती सोशल मिडियाच्या माध्यमातून तरूणाई प्रसारित करत आहेत. याचा फायदा इथल्या पर्यटन व्यवसायवृद्धीला निश्‍चितपणे होणार आहे.
आजकाल इनफिल्ड बुलेट चालवण्याचे फॅड फारच वाढले आहे. ही राजेशाही मोटरसायकल पेट्रोल आणि देखभालीच्यादृष्टीने खर्चीक असली तरी ती घेण्याचा, वापरण्याचा मोह, आजच्या तरूणाईतही कायम आहे. मुंबईतील तरूणाईतही हे चित्र पहायला मिळते. मात्र या सवारीचा आनंद निव्वळ शहरातून फिरण्यासाठी नव्हता. काहीतरी वेगळं करण्याच्यादृष्टीने मुंबईतील तरूणांनी एकत्र येवून रॉयल्स थम्पर्स क्लबची स्थापना केली. सुट्टीच्या दिवशी एखाद्या ठिकाणाला भेट द्यायची, तिथली माहिती, महती, फोटोग्राफ्स सोशलमिडियाद्वारे अनेकांपर्यंत पोहोचवायचे, तिथल्या समस्या मांडायचेही प्रयत्न करायचे, हा या ग्रुपचा प्रमुख उद्देश. यापूर्वी या ग्रुपने लोणावळा, भंडारदरा, अलिबाग, हरिहरेश्‍वर, श्रीवर्धन, दिवेआगर, शिर्डी, नाशिक या भागाचे दौरे केले.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणकडे त्यांची नजर न जाते तर नवलच. यापैकी एका तरूणाने मुळ कोकणचा असल्याने इथली नवलाई सहकार्‍यांना सांगितली आणि रॉयल थम्पर्स रत्नागिरीत येऊन थडकले. कशेडी, परशुराम घाटातील निसर्गसौंदर्याने त्यांना घायाळ केले. रत्नागिरीत गणपतीपुळे, भगवतीमंदिर, पावसचे श्री स्वामी स्वरूपानंद मंदिरात ते नतमस्तक झाले. आरे-वारे बीच, मांडवी बीच, गणपतीपुळे समुद्राने त्यांना हरवून टाकले. आपोआपच कॅमेरे क्लिक झाले. इथला भक्तीभाव, सौंदर्य कॅमेराबद्ध झाला. मुंबईतही मालवणी, कोकणी जेवण मिळते पण इथे आल्यावर इथल्या जेवणाची लज्जत काही औरच, अशा प्रतिक्रिया या तरूणांमधून उमटतात.
घरी परतल्यावर अर्थातच ही माहिती इतर सहकारी, मित्र, नातेवाईकांना देण्यासाठी त्यांची साहजिकच घाई उडते. इथले सौंदर्य फोटोतून पाहिल्यावर पर्यटकांची झुंबडच्या झुंबड कोकणात दाखल झाली तर आश्‍चर्य वाटायला नको. अर्थात या वाढत्या गर्दीसाठी कोकणातल्या रस्त्यांचे चौपदरीकरण व्हायला हवे. यामुळे सर्वांचा प्रवास विनाअपघात होईल आणि इथल्या सौंदर्यात अधिकच भर पडेल, असे या तरूणांना वाटते.रॉयल थम्पर्सनी गेल्या सहा-सात महिन्यात हजारो किलोमीटरचा प्रवास केला. मात्र महामार्ग, तिथले नियम त्यांनी काटेकोरपणे पाळले. म्हणूनच आजवर त्यांच्या प्रवासात कधीही, कोणतीही दुर्घटना झालेली नाही. प्रवासात प्रत्येक सदस्य नेहमीच हेलमेटचा वापर करतो. योग्य त्या गतीने वाहन चालवण्यावर त्यांचा भर असतो. रत्नागिरीत हेल्मेट घालून वावरणारे मोटरसायकलस्वार पाहिल्यावर त्यांच्याकडे काही लोकांनी विचित्र नजरेने पाहिले. त्यावर नियम म्हणून नव्हे तर सुरक्षितता म्हणून आपणही सर्वांनी हेल्मेट वापरायला हवे, असा संदेश देऊन ते परतीच्या प्रवासाला निघाले. सौंदर्यदर्याचा खराखुरा आस्वाद मोटरसायकल प्रवासातून मिळवता येतो, असे या रॉकल थम्पर्सना वाटते. रत्नागिरी भेटीवर आलेल्या या तरूणांमध्ये राहुल कुरील, प्र्रफुल्ल भाटकर, सेहज सिंग, सुशिल खट्टे, इकबाल सिंग, जय, शैलेश पवार या महाराष्ट्राबाहेरील थम्पर्सचा समावेश होता.