Saturday, Jan 20th

Headlines:

नव्या जाणीवांचा जागर

E-mail Print PDF
shraddha-kalambate_new
1357884649_haldi-kumkum-350
जानेवारी महिना म्हणजे महिला वर्गाला पर्वणीच! अर्थात सुवासिनींकरता (?) आपल्याला ठाऊक आहेच की नवविवाहिता, सुवासिनी यांना हळदीकुंकवाचे किती वेध लागलेले असतात ते! त्यासाठी महिनाभर आधी जय्यत तयारी सुद्धा चालू असते. ठेवणीतल्या खास साड्या, शालू, दागदागिने आणि हो, वाण काय लुटायचं यांवर घरोघरी चर्चा झडत असतात. पण ही सगळी तयारी, त्यामागची मानसिकता तुम्हाला कालबाह्य वाटत नाही का?
तुम्ही म्हणाल, आमची रूढी-परंपरा तुम्हाला कालबाह्य वाटते का? तर नाही रथसप्तमीपर्यंत चालणारा हा हळदीकुंकवाचा सण खरोखरच आजच्या काळातही आपल्या व्यस्त जीवनातून एकमेकींना भेटण्यासाठी एक उत्तम निमित्त आहे. परंतु त्याचं स्वरूप आपण थोडसं व्यापक केलं तर निश्‍चितच या २१ व्या शतकात हा सण सर्वसमावेशक असा होईल. अर्थात गेल्या दशकात बहुतांशी ठिकाणी त्याचं स्वरूप अपेक्षेप्रमाणे बदललेलं दिसतंय. परंतु अजूनही ग्रामीण भागातून, छोट्या शहरातून त्याचं स्वरूप बदलणं ही काळाची गरज बनलीय.
दहा वर्षापूर्वी आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हळदीकुुंकवाऐवजी ‘तिळगुळ समारंभ’ हा शब्दप्रयोग वापरून केवळ सुवासिनींसाठी नव्हे तर विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत, प्रौढ कुमारिका या सर्वांना या कार्यक्रमात सामावून घेतलं. बदल एवढाच करावा लागला प्रत्येकीला हळदपिंजर लावण्याऐवजी तिळगुळ आणि फुलं, त्याजोडीला भेटवस्तू, त्यात एखादं सुंदरसं पुस्तक किंवा छोटीशी उपयुक्त वस्तू देतो. गेल्या २ वर्षात तर स्त्री-पुरूष यांच्यासाठी एकत्रित तीळगुळ समारंभ आयोजित करून भेटवस्तूला फाटा दिला. आणि त्यावेळेस दोघांनाही उपयुक्त ठरेल असे एखादे चर्चासत्र ठेवले. सर्वांना खूप आनंद झाला. याशिवाय झोपडपट्टी, अनाथ, निराधार मुलांची बालगृह इथेही तिळगूळ वाटतो. आहे की नाही आजच्या युगाला सर्वसमावेशक असा ‘हळदीकुंकू’ अर्थात तिळगूळ समारंभ. पूर्वी स्त्रिया घराबाहेर पडत नसत. परंतु सध्या सर्वच स्त्रियांना त्यांच्यात्यांच्या गरजेनुसार उंबरठा ओलांडावा लागतोय. मग अशावेळी सुवासिनी आणि ‘इतर’ असा भेदभाव कशासाठी?
असो, १८ व्या शतकात सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा मंत्र देऊन पुरूषांच्या बरोबरीचा दर्जा दिला. आज दिडशे वर्षानंतरही स्त्रियांच्या समस्या मात्र सुटलेल्या नाहीत. उलट कालपरत्वे त्यात भरच पडताना दिसतेय. बालविवाह, हुंडाबळी, मुलींचं घटतं प्रमाण, महिलांवरील अन्याय - अत्याचार इ. समस्यांनी समाजाची नैतिक घडी पार विस्कटलेली आहे. आपलं शासन यावर वेळोवेळी अनेकविध योजनांद्वारे उपक्रम राबवित असतं.
यावर्षी सावित्रीबाई फुले जयंतीदिनापासून ‘लेक शिकवा’ अभियान राज्यभर राबवलं जातंय. यात महिला-मुलींच्या संबंधित विविध उपक्रम आखले गेलेत. जेणेकरून महिलांच्या सर्व समस्यांबाबत समाजात जाणीव जागृती निर्माण व्हावी तसेच शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींना शिक्षण प्रवाहात मिसळता यावं. ऊसतोड कामगार, वीटभट्टी, बांधकाम कामगार, खाण कामगार, भटके समाज इ. कामगारांची मुले जिथे जिथे वस्तीला असतील तिथल्या शाळांमध्ये त्यांना प्रवेश देणं बंधनकारक आहे. शिवाय कोणत्याही महिन्यात त्यांना प्रवेश देण्यात यावा अशी तरतूद आहे. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.
३ जानेवारी हा स्त्री मुक्तीदिन, बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो. परंतु जोपर्यंत महिलांकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत या दिनाची ‘दीनावस्था’ काही संपणार नाही. गेली २८ वर्षे वेगवेगळ्या जिल्ह्यातून, ग्रामीण तसेच शहरांतून महिलांशी, विद्यार्थ्यांशी सवांद साधण्याची संधी मिळाली परंतु बहुतांशी स्त्रियांची वैचारिक कुवत आजही घराच्या उंबरठ्याआडच पहायला मिळाली. उंबरठ्याबाहेर पडणार्‍या स्त्रियाही आपल्या हक्काच्या बाबतीत फारशा उत्सुक दिसल्या नाहीत. नवीन काही जाणून घेण्याची मानसिकता नाही. हे चित्र बदलण्याची गरज आहे. यासाठी सण-समारंभाचे नवीन संदर्भ, नवे अर्थ, नव्या संकल्पना महिलांनी आत्मसात करून काळाबरोबर वाटचाल करणं योग्य नाही का?
-श्रद्धा कळंबटे
संपर्क ः हेल्पलाईन स्वयंसेतू-९४२२४३०३६२, ८१४९४३६४५८.
Website : www.swayamsetu.org, email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it