Saturday, Jan 20th

Headlines:

परिवर्तनाची नांदी

E-mail Print PDF
shraddha-kalambate_new
india
civilsociety
   थर्टी फर्स्ट, थर्टी फर्स्ट, थर्टी फर्स्ट, केवढी भुरळ घातलीय या दिवसाने लहान-थोर सार्‍यांनाच! काय बरं महत्व असतं या दिवसाला आणि नेमका तो कसा साजरा केला जातो हे पाहणं गरजेचं आहे. मनोरंजन, ओल्या-सुक्या पार्ट्या, धांगडधिंगा आणि सरत्या वर्षात फारसं तसं काहीही न करता मोठ्या दिमाखात (?) त्याला निरोप देणं. मग त्याच धुंदीत नवीन वर्षाचं स्वागत! आता वर्षभर मोकळे सरत्या वर्षाच्या निरोपापर्यंत! एवढच नव्हे तर फ्रेंडशीप डे, व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे... अशा विविध डेजनी आपल्या भारतीय संस्कृतीवर आक्रमण केलंय हे नाकारून चालणार नाही. पाश्‍चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करत असताना त्यांचं स्वावलंबन, स्वच्छता, कठोर परिश्रम आणि शिस्त इ. गुणांकडे मात्र आपण सोयीस्करपणे पाठ फिरवतो, ज्याची आज आपल्याला सर्वात जास्त गरज आहे. पाडवा मैफल, दिवाळी मैफल (पहाट), वसंत व्याख्यानमाला, नववर्ष स्वागत मजा इ. खास आपल्या संस्कृती धाटणीचे कार्यक्रम नेटाने आखणारे, त्यांचा आस्वाद घेणारे आणि त्यात सहभागी होणारे मात्र ठराविकच! कालाय तस्मै नमः! दुसरं काय?
वाचकहो, नवीन कॅलेंडर वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छा एवढ्यासाठीच कारण स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ६६ वर्षात आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा लेखाजोखा मांडला तर नक्कीच कमावलेल्यापेक्षा गमावलेल्याचं पारडं निश्‍चित जड होईल. याची तुम्हालाही कल्पना असेलच. पटंतय ना तुम्हाला? माणूस, माणुसकी, आपलेपणा, नातेसंबंध, जिव्हाळा, घरपण, प्रांजळपणा, प्रामाणिकपणा हे सारंच आपण गमावलंय. त्या बदल्यात पैसा, प्रसिद्धी, भ्रष्टाचार, दहशतवाद, घोटाळे, विश्‍वासघात, अन्याय-अत्याचार, व्यसनाधीनता, बेकारी, जातीयवाद, प्रांतीयवाद, अंधश्रद्धा यांचे आपण कधी गुलाम झालोय हे आपल्याला कळलंच नाही.
एकीकडे विज्ञान, तंत्रज्ञान, विविध शोध यांच्या जोरावर आपण जग मुठीत आणलं तर याच्याच दुरूपयोगाने आपण परस्परांपासून मनाने दुरावलो. याला आपली हार म्हणावी की जीत? असं असलं तरीही प्रत्येक रात्रीनंतर उषःकाल हा होतोच. तद्वतच सुखदुःखाचा, यशापयशाचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो. या खेळाने गेल्या ६६ वर्षात आपण जे जे गमावलं ते ते पुन्हा मिळवण्याची ईर्षा आपल्यात निर्माण केलीय. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी, देशभक्तांनी आपल्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळवलं होतं सार्‍या देशबांधवांसाठी. परंतु त्या स्वातंत्र्याचं ‘सुराज्य’ करणं मात्र आपल्याला जमलं नाही दीडशे वर्षांच्या प्रदीर्घ गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर लोकशाही स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्याला कळलाच नाही. सुराज्याऐवजी ‘स्व’राज्यातच आपण रमलो, ‘मी-माझं’ या कोशातच स्वतःला जखडून घेतलं. याचाच गैरफायदा उठवला मूठभर स्वार्थी, आपमतलबी, राजकारणी लोकांनी आणि हळुहळू आपण  गेल्या ६६ वर्षात पुन्हा आपल्याच या मूठभर बांधवांच्या पारतंत्र्यात, गुलामगिरीत कधी गुंतून पडलो हे लक्षातच आलं नाही.
याचा परिणाम म्हणून आज सर्वच क्षेत्रात सामाजिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इ. क्षेत्रात बजबजपुरी माजलीय आणि याचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलंय की आता सर्वसामान्य माणसांची सहनशक्ती संपलीय. त्यामुळे सर्वच क्षेत्रात आज स्फोटक वातावरण निर्माण झालंय. याला योग्य दिशा मिळाल्यास नक्कीच स्फोट होणार आहे. गरीब आणखीन गरीब आणि श्रीमंत आणखीन श्रीमंत ही दरी दिवसेंदिवस वाढवणारी आपली राज्यपद्धती आहे हे सर्वांनाच आता कळून चुकलंय. यातूनच ही सर्व सत्ता उलथून टाकण्याची ईर्षा समाजात निर्माण झालीय. गेल्या वर्षभरात याची सुचिन्हे दिसू लागलीयत. हीच खरी परिवर्तनाची नांदी म्हणावी लागेल.
टू जी स्पेक्ट्रम, आदर्श इ. सारखे अनेक महत्वपूर्ण घोटाळे उघडकीस आले. भ्रष्टाचार, लाचलुचपत प्रकरण प्रत्येक जिल्ह्यात उघड होताहेत. त्यांना रंगेहाथ पकडून सर्वसामान्य जनतेला खर्‍या अर्थानं दिलासा मिळतोय. लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमांना फाशीची शिक्षा दिली जातेय. यातून मंत्री-संत्री, स्वतःला साधूसंत म्हणवणारेही सुटलेले नाहीत. ही समाधानाची बाब आहे. चोरी, खून, दरोडा, छेडछाड इ. करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या जाताहेत. सर्वत्र ५० टक्के महिलाराज आलंय. त्यामुळे वाडी-वस्तीवरील महिलाही जागृत झाल्यायत. एकूणच स्त्रीशक्ती आपल्या हक्कांच्या बाबतीत बंडखोर झालीय. अशा परिस्थितीत तिच्या शीलाला दिलं गेलेलं अवास्तव महत्व दुर्लक्षित करून तिने तिच्या मनाचे पावित्र्य, कणखरपणा सिद्ध केला पाहिजे. तर आणि तरच ती या पुरूषप्रधान संस्कृतीत आपलं वर्चस्व टिकवून ठेवू शकेल. असा काळ लवकरच येईल याची मला खात्री आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये ‘आम आदमी’चा झालेला विजय म्हणजे नको असलेली सत्ता आम्ही उलथून टाकू शकतो याचं ज्वलंत उदाहरण आहे. आता हेच परिवर्तन देशाच्या कानाकोपर्‍यात अपेक्षित आहे. जी जी गोष्ट संपूर्ण समाजाला, सर्वसामान्य जनतेला हानिकारक आहे तिला आम्ही हद्दपार करू शकतो हा आत्मविश्‍वास असाच टिकवून ठेवला पाहिजे. मग तो गुन्हेगार, अपराधी कुणीही असो. शासकीय योजनांवरील करोडो रुपयांच्या योजना कार्यान्वित करताना त्या काटेकोरपणे राबवल्या पाहिजेत. कारण हा सर्व पैसा जनतेचा आहे. परंतु यासाठी होणारी कोट्यावधींची टक्केवारीची उलाढाल सर्वप्रथम नेस्तनाबूत झाली पाहिजे. तर आणि तरच आपण प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होवू शकतो. सर्वसामान्य जनतेने आपला नेता मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेला असतो. त्याने अपेक्षाभंग करताच त्याला राजसत्तेवरून खाली खेचता आले पाहिजे. प्रत्येक तरूणाला रोजगार मिळालाच पाहिजे. प्रत्येकाच्या मुलभूत गरजा त्याला सहजपणे भागवता आल्या पाहिजेत. याची जाणीव आता आपल्या तरूण पिढीला प्रकर्षाने होत आहे. २०२० साली भारत महासत्ता बनणार आहे. गावोगावी तरूणांशी, महिलांशी सुसंवाद साधत असताना मला समाजात अपेक्षित वर्तनबदल नक्कीच जाणवतोय. तरूणांनो, तुमचा बुध्यांक झपाट्याने वाढतोय याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. परंतु या संघर्षात तुमचा भावनांक मात्र कमालीचा घसरत चाललाय याचीच काळजी वाटतेय. तेव्हा त्याची काळजी घ्या. आपल्या मनाची योग्य मशागत करा. अन्यायाविरूद्धची ठिणगी सतत प्रज्वलीत ठेवा. वेळोवेळी तिचा भडका उडाला पाहिजे. परंतु अहिंसेच्या सनदशीर मार्गाने. आपल्याच राष्ट्रीय संपत्तीची तोडफोड, जाळपोळ करून नव्हे. अशा काही मुलभूत गोष्टी आपण पाळल्या तर स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होईस्तोवर आपण खर्‍या अर्थानं स्वातंत्र्याचं सुराज्य उपभोगू शकू यात तिळमात्र शंका नाही.
-श्रद्धा कळंबटे
संपर्क ः हेल्पलाईन स्वयंसेतू-९४२२४३०३६२, ८१४९४३६४५८.
Website : www.swayamsetu.org, email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it