Saturday, Jan 20th

Headlines:

सह्यगिरीतील गांधी

E-mail Print PDF
shraddha-kalambate_new
रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आबा नारकर यांच्या चरित्र प्रकाशनाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांनी या पुस्तकाचा घेतलेला वेध...!
रत्नागिरी जिल्हा हा ‘नररत्नांची खाण’ म्हणून सुप्रसिद्ध आहे. महर्षि कर्वे, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग काणे, साने गुरूजी, आप्पासाहेब पटवर्धन ते सचिन तेंडुलकर ही यादी फार मोठी आहे. कारण विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान झालेल्या अनेक महनीय व्यक्ती आहेत. तद्वतच प्रसिद्धी पराड.मुख अशाही अनेक व्यक्ती या जिल्ह्यात कार्यरत होत्या. त्यापैकीच एक म्हणजे गोपाळ बाळकृष्ण नारकर उर्फ आबा नारकर, राजापूर तालुक्यातील पाचल गावचे, कोकणचे सुपुत्र, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक.
आबांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातील १९०८ सालचा. साहजिकच जाज्ज्वल्य देशप्रेमाने भारलेलं वातावरण दीनदुबळ्या-दलित समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता अहोरात्र झटणार्‍या, समाजातील जातीयता, अंधश्रद्धा, अज्ञान, अस्पृश्यता, निरक्षरता नाहिशी करून समतेवर आधारित सर्वांना विकासाची समान संधी देणारी समाजव्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न पाहणार्‍या ध्येयवेड्या कार्यकर्त्यांना स्वस्थ बसू देईल तरच नवल! आबा केवळ कार्यकर्ते नव्हते तर अशा शेकडो कार्यकर्त्यांना योग्य दिशा दाखवणारे आदर्श नेते होते हे त्यांच्या सुकन्या प्रा. स्नेहल नेने यांनी लिहिलेल्या ‘सह्यगिरीतील गांधी’ हे चरित्र वाचताना सतत जाणवतं.
अंधारातील दीप, बालपण, जडणघडण, शिक्षण, सत्याग्रह, विवाह, १९४२ चा लढा, स्वातंत्रप्राप्तीनंतर,परिवर्तनाच्या चळवळी, शैक्षणिक कार्य, स्त्रियांच्या आत्मनिर्भरतेसाठी, एक हळवा कोपरा, सहकारी संस्थांचे जाळे, गांधी स्मारकनिधी, असे सहकारी अशी नाती, मातृहृदयी पिता, हृदयस्पर्शी स्पंदने अशा १७ प्रकरणातून आबांचा खडतर जीवनसंग्राम स्नेहलताईंनी अतिशय प्रवाही, ओघवत्या शैलीत उलगडला आहे. त्याचं पिता-पुत्रीचं जिव्हाळ्याचं नातं असूनही त्यांनी आबांच्या कार्यातील अपयशाचे प्रसंगही अगदी प्रांजलपणे चितारले आहेत. पिता म्हणून त्यांच्या कार्याचा केवळ उदो-उदो करण्याचा मोह त्यांनी तारतम्याने टाळलेला जाणवतो. आबांचं चरित्र वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने खटकते, ती म्हणजे ६०-७० वर्षांपूर्वी आबा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ज्या सामाजिक समस्यांसाठी आपलं जीवन खर्ची घातलं होतं. त्या सर्व समस्या आजही आपल्याला भेडसावत आहेत. याचाही त्यांनी अगदी प्रामाणिकपणे उल्लेख केलेला आहे.
अर्थात या समस्यांची धार काहीशी बोथट झाली असली तरी त्याचं समूळ उच्चाटन मात्र या देशभक्तांच्या बलिदानाने होऊ शकलेलं नाही. याला आपणच सर्व जबाबदार नाही का?
यासाठी आजच्या तरूण पिढीने अशी चरित्रं आवर्जून वाचली पाहिजेत. त्यातून त्यांना आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा पूर्वेतिहास, आबांसारख्या हजारो कार्यकर्त्यांचं निःस्वार्थी, निरलस, समर्पित सामाजिक कार्य यांची ओळख होईल. आपणही हे कार्य असंच पुढे चालू ठेवून, खर्‍या अर्थानं लोकशाही अस्तित्वात आणून ‘स्वातंत्र्याचं सुराज्य’ हे या थोर नेत्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार करावं. हीच आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची मनस्वी इच्छा आहे.
या पुस्तकाचे मुखपृष्ठ गांधी युगातील चळवळी आणि गांधीवादी विचारसरणीच्या आबांच्या चरित्राला अगदी पूरक असंच आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम पंदेरे यांची समर्पक अशी प्रस्तावना या चरित्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. या चरित्राचे प्रकाशन रविवार दि. २२ डिसेंबर रोजी आबांच्या कार्यभूमीत पाचल ग्रामसचिवालयात होत आहे. योगायोगाने माझ्या सामाजिक कार्याची सुरूवात याच कर्मभूमीत होण्याची आणि अशा थोर नेत्याच्या चरित्राबद्दल लिहिण्याची संधी मला अनायासे मिळाल्याने मी या भूमीची तसेच ज्यांनी ज्यांनी मला हे कार्य करण्याची सुसंधी प्राप्त करून दिली त्या सर्वांची शतशः ऋणी आहे.  
-श्रद्धा कळंबटे
संपर्क ः हेल्पलाईन स्वयंसेतू- ९४२२४३०३६२, ८१४९४३६४५८.
Website : www.swayamsetu.org,
email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it