Saturday, Jan 20th

Headlines:

एचआयव्हीमुक्त समाजाचे स्वप्न साकार करूया

E-mail Print PDF
shraddha-kalambate_new
hiv-aids-logo
१ ते ७ डिसेंबर हा एड्‌स नियंत्रण जनजागृती सप्ताह म्हणून पाळला जातो. गेले दशकभर या आजाराबाबत तळागाळापर्यंत आरोग्य विभाग आणि आमच्यासारख्या स्वयंसेवी संस्था सातत्याने प्रबोधन करीत आहेत. तरीसुद्धा या आजाराबाबतची परिपूर्ण शास्त्रीय माहिती सर्वांनाच आहे असं म्हणता येणार नाही. यासाठी आधी आपण याची थोडी प्राथमिक माहिती घेऊ.
२१ व्या शतकाच्या सुरूवातीस सुमारे साडेतीन कोटी व्यक्ती कखत बाधित असल्याची नोंद जगातील आरोग्य संघटना (WHO) आणि (UNAIDS) यांच्याकडे आहे. यातील जवळपास ९०% व्यक्ती केवळ विकसनशील राष्ट्रांत आहेत. भारतामध्ये एचआयव्हीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. म्हणूनच या गंभीर आजाराचे परिणाम आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य व स्थानिक पातळीवर दिसून येत आहेत. तसेच हे परिणाम कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय व वैयक्तिक पातळीवरही होत आहेत.
भारतातील एचआयव्ही बाधित व्यक्तींचे प्रमाण ज्या राज्यांमध्ये मोठ्या प्र्रमाणात आहे. त्यात महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे. या आजारावर अद्याप कोणतेही रामबाण औषध किंवा लस उपलब्ध झालेली नसली तरी शासकीय, निमशासकीय व स्वयंसेवी संस्थांतर्फे हरतर्‍हेने प्रयत्न केले जात आहेत. या संस्था प्रतिबंधात्मक कार्यक्रम तसेच निगा, काळजी आणि उपचार कार्यक्रम राबवतात. विशेषतः तरूण वर्गास या आजाराबद्दलची शास्त्रीय माहिती अधिकाधिक पोहचवण्यासाठी प्र्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर एचआयव्ही बाधित गर्भवती स्त्रीच्या काळजी आणि आधाराच्यादृष्टीने महत्वाची पावले टाकली जात आहेत.
     एचआयव्ही म्हणजे ह्यूमन इम्यूनोडेफिशियन्सी व्हायरस अर्थात माणसातील प्रतिकारशक्ती कमी करणारे विषाणू. एचआयव्हीमुळे एड्‌स होतो. परंतु एचआयव्ही बाधित असणे म्हणजे एड्‌स झाला असे नव्हे.
     एड्‌स म्हणजे ऍक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम. (निरनिराळ्या लक्षणांचा समूह) प्रदीर्घ काळ एचआयव्ही संसर्गामुळे एड्‌स होतो. एचआयव्हीमुळे कमी होणार्‍या प्रतिकारशक्तीचा परिणाम म्हणून निर्माण होणार्‍या लक्षणांच्या समूहाला एड्‌स असं म्हणतात. एचआयव्हीचा विषाणू हा शरीरातील प्रतिकारशक्तीचे टप्प्याटप्प्याने खच्चीकरण करत कुठल्याही प्रकारच्या संसर्गाला तोंड देण्याची क्षमता नष्ट करतो.
सर्वसाधारणपणे ज्यांना एचआयव्हीचा संसर्ग झालेला आहे अशा व्यक्तींमध्ये एड्‌स ८ ते १० वर्षाच्या कालावधीत विकसित होतो. काही व्यक्ती मात्र संसर्गित झाल्यानंतर १५ वर्षेसुद्धा एड्‌स न होता रहाते. हे प्र्रमाण मात्र अत्यल्प आहे. हा कालावधी व्यक्तीगणिक कमी अधिक दिसतो.
एचआयव्ही विषाणू हा विर्यातून, योनीस्त्रावातून, रक्तातून व स्तनपानातून संक्रमित होतो.
   संक्रमणाचे प्रमुख चार मार्ग संभवतात. १) असुरक्षित यौन संबंधाद्धारे एचआयव्हीची लागण होऊ शकते. २) बाधित व्यक्तीच्या दुषित रक्ताद्वारे निरोगी व्यक्तीला त्याची लागण होऊ शकते. ३) दुषित रक्त असलेल्या सुई, इंजेक्शन निरोगी व्यक्तीस वापरल्या गेल्यास एचआयव्हीचे संक्रमण होवू शकते. ४) संसर्गित महिलेकडून बाळाला गर्भात असताना प्रसूती समयी किंवा स्तनपानाद्वारे याची लागण होऊ शकते.
लैंगिक संबंधातून एचआयव्ही संक्रमणाची शक्यता वाढते. ज्यावेळी व्यक्तीला गुप्तरोग असतात व तो त्यावर उपचार घेत नसतो. अशावेळी बलात्कारामुळेही एचआयव्ही संक्रमणाची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
एचआयव्हीचा विषाणू सहजरित्या शरीराच्या बाहेर जगू शकत नाही. त्यामुळे स्वच्छतागृह वापरल्याने, आलिंगन दिल्याने, चुंबनाने किंवा हातात हात घेतल्याने, ताटवाटी किंवा पिण्याची भांडी वापरल्याने किंवा खोकल्याने तो पसरत नाही. डास चावल्यानेही एचआयव्हीचा प्रसार होत नाही. एचआयव्हीचे विषाणू जरी लाळेत आढळून आले तरी प्रदीर्घ चुंबनाने एचआयव्ही संसर्ग झाल्याचा पुरावा नाही. तोंडामध्ये जखमा असल्यास मात्र मुखमैथुनाच्या माध्यमातून संक्रमणाची शक्यता नाकारता येत नाही.
एचआयव्ही बाधित व्यक्तीची सेवा/सुश्रूषा केल्याने, एकच कपडे किंवा एकच फोन वापरल्यानेही हा विषाणू संक्रमित होत नाही. तेव्हा वाचकहो, एचआयव्ही हा भयानक रोग नसून त्याबाबतचे सर्व गैरसमज मनातून काढून टाका. एचआयव्ही बाधित रूग्णाला समजून घ्या. त्याला प्रेम द्या. इतर सर्वसामान्य आजारांप्रमाणेच तो एक आजार आहे. परंतु त्यावर सध्यातरी रामबाण औषध किंवा लस उपलब्ध नाही.
डॉक्टर्स सर्वसाधारणपणे एड्‌सचा संशय घेतात. ज्यावेळी रूग्ण काही विशिष्ट लक्षणं दर्शवितो आणि संसर्गावर केलेल्या उपचारांना प्रतिसाद देत नाही. उदा. क्षयरोगाचे जंतू हे सर्वसाधारणपणे फुफ्फुसाच्या वरच्या भागात आढळतात. पण एचआयव्ही संसर्गित व्यक्तींच्या बाबतीत मात्र क्षयरोग हा शरीरभर पसरतो.
      काही प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे- एक महिन्यातून अधिक काळ जुलाब होणे, वारंवार नागीण होणे, विशिष्ट ग्रंथीना सूज येणे, सर्व अंगावर खाज येणारे पुरळ, विशिष्ट प्रकारचा कर्करोग. याव्यतिरिक्त एक महिन्याहून अधिक काळ ताप, खोकला येणे, वजन झपाट्याने कमी होणे ही सुद्धा लक्षणे आढळतात.
सीडी ४ पांढर्‍या रक्तपेशींमधील घट हे जागतिक पातळीवर एड्‌सचे लक्षण मानतात. एचआयव्ही/एड्‌सचे निदान सध्या इलायझा चाचणीद्वारे केले जाते. निदान करण्यासाठी ही चाचणी तीन वेगवेगळ्या पद्धतीने करतात. तिन्ही चाचण्या सकारात्मक (पॉझीटीव्ह) आल्यास त्या व्यक्तीला एचआयव्हीची बाधा आहे असे समजतात.
      एचआयव्हीची चाचणी कुणीही करून घेऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या मनात एचआयव्हीच्या लागणीची शंका असल्यास त्याने ही चाचणी करून घ्यावी. विवाहपूर्व/विवाहबाह्य/अनोळखी व्यक्तीशी लैंगिक संबंध असल्यास आपण चाचणी करू शकता. तसेच गर्भधारणा होणार्‍या बाळाला होणारी बाधा औषधोपचाराने टाळता येणे शक्य असल्याने अशावेळी चाचणी जरूर करून घ्यावी.
     वाचकहो, आपल्याकडे विवाह जुळवताना जन्मपत्रिका पहाण्याची फार जुनी परंपरा आहे. परंतु अशा पत्रिका पाहूनसुद्धा एचआयव्हीची लागण दुसर्‍या जोडीदाराला झाल्याची असंख्य उदाहरणं आहेत. आमच्याकडे आलेल्या प्र्रकरणांना आम्ही योग्य तो न्याय मिळवून दिलेला आहे. पत्रिका पाहून कोणा ज्योतिषाने त्या व्यक्तीला हा आजार झालेला असल्याचं सांगितल्याचं ऐकिवात नाही म्हणूनच तुमची इच्छा असल्यास पत्रिका जरूर पहा परंतु सावधगिरी म्हणून दोघांचीही एचआयव्ही तपासणी करून घेणं ही काळाची गरज झालीय. अनोळखी कुटुंबाशी सोयरीक जुळवताना अशी काळजी घेणं केव्हाही चांगलं.
एखाद्या मुलीची अशा तर्‍हेने फसवणूक झाल्यास तिला सहज घटस्फोट मिळू शकतो. नुकसानभरपाईही दिली जाते. मात्र या आजाराची लागण झालेली असेल तर तिच्या आयुष्याची भरपाई कशी करणार?
दोन दशकांपूर्वी हा आजार केवळ विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित होता. परंतु आता तो गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण असा सर्वच स्तरांवर पसरलेला दिसतो. कारण केवळ असुरक्षित लैंगिक संबंध एवढेच एकच कारण या आजाराला कारणीभूत नाही. इतर तीन कारणांमुळेही त्याची लागण एखाद्या निष्पाप व्यक्तीला होऊ शकते. यासाठी आपण सावध असलं पाहिजे. गावोगावी होणार्‍या मोठ्या शिबिरातून एकच इंजेक्शन किंवा सुई अनेकांना वापरणं अशा घटना अजूनही घडताना दिसतात. अशावेळी आपण ताबडतोब डॉक्टरांना जाब विचारून अशी शिबीरं बंद पाडली पाहिजेत. वरिष्ठांकडे तक्रार केली पाहिजे.
   आपलं आयुष्य हे अनमोल आहे. यासाठी क्षणिक सुखासाठी ते उद्ध्वस्त करू नका. तरूणांनी आयुष्याच्या प्र्रत्येक टप्प्यावर जागरूक, दक्ष राहणं हे योग्य नाही का?
  याबाबत काही शंका असल्यास जरूर संपर्क साधा.
-श्रद्धा कळंबटे
संपर्क-हेल्पलाईन स्वयंसेतू-९४२२४३०३६२, ८१४९४३६४५८.
Website : www.swayamsetu.org, email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it