Tuesday, Jan 23rd

Headlines:

ऑनर किलींग एक सामाजिक कीड

E-mail Print PDF
shraddh-kalambate
owner-killing1
गुन्हे करणारे कितीही चलाख, तल्लख बुद्धीचे, विद्याविभूषित असले तरीही कायदे आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे हात त्यांच्यापेक्षाही लांब असतात. हे पुन्हा एकदा आरूषी प्रकरणात सिद्ध झालंय. आई-वडील दोघंही डॉक्टर असल्याने आपल्या अक्कल हुशारीने (?) आपलं कुकर्म आपण सहज पचवू शकू या भ्रमात त्यांनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. परंतु सफाईदारपणे गळा चिरणं हे भुरटे चोर किंवा सर्वसाामान्य माणसाला कदापि शक्य होणार नाही. हा अगदी साधा मुद्दा त्यांच्या अविवेकी बुद्धीच्या नजरेतून सुटला आणि ती दोघंही प्रत्यक्षदर्शी पुराव्याअभावी अलगद कायद्याच्या कचाट्यात सापडली आणि न्यायव्यवस्थेने परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारेही गुन्हेगारांना शासन केलं जाऊ शकतं हे आरूषी प्रकरणावरून सिद्ध केलंय.
आजपर्यंत घरच्यांच्या मनाविरूद्ध प्र्रेमविवाह केलेल्या कित्येक तरूणींना, जोडप्यांना ‘ऑनर किलिंग’ला बळी पडावं लागलंय. २००९-१० साली दिल्लीसारख्या महानगरात एकामागोमाग एक झालेल्या या घराण्याच्या प्र्रतिष्ठेपायींच्या हत्यांनी सर्व समाज हादरून गेला होता. राजरोसपणे केवळ ‘प्र्रेम केलं’ या भयंकर गुन्ह्यांपायी निष्पाप जीवांची हत्या करून ‘आम्ही केलं ते योग्यच केलं’ हा बेगडी प्रतिष्ठेचा आव त्यांच्या वागण्या बोलण्यात पाहिल्यावर कुठल्याही सद्विचारी, विवेकी, तसेच माणुसकी जपणार्‍या, मानणार्‍या व्यक्तीच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.
तलवार दाम्पत्याच्या अमानवी क्रूरतेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आणि २००८ साली घडलेल्या घटनेने पुन्हा एकवार ‘ऑनर किलिंग’चा इतिहास जागवला. आपल्या आयुष्यात आपण कशाला महत्व द्यायचं हे प्रत्येक व्यक्तीगणिक ठरवायचं स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीने आपल्याला मिळालेलं आहे. सर्वधर्मसमभाव मानणारा आणि जपणारा असा आशिया खंडातील सर्वात मोठा देश म्हणून अभिमानाने, कौतुकाने आपल्याकडे पाहिलं जातं. आपल्या सर्वसमावेशक संस्कृतीचा परदेशातही अभ्यास केला जातो. त्यावर चिंतन केलं जातं. कित्येकांनी आपली भारतीय संस्कृती याच कारणाने अंगिकारलेली आहे परंतु खोट्या प्रतिष्ठेच्या, घराण्याच्या आहारी जाऊन ज्या हत्या केल्या जाताहेत त्या खरोखरच सुसंस्कृत मनाला शरमेनं मान खाली घालायला लावणार्‍या आहेत.
‘ऑनर किलींग’ अर्थात ‘प्रतिष्ठेचे बळी’ ही सुद्धा पूर्वापार चालत आलेली एक अमानुष प्रथाच म्हणायला हवी. अगदी राजेरजवाडे, संस्थानिकांच्या काळातसुद्धा अशा घटना घडत होत्या परंतु अशी प्रकरणं उघड होत नव्हती. अशा हत्या करून त्यांचा परस्पर बंदोबस्त केला जायचा. त्यानंतर ती व्यक्ती मानसिक रूग्ण किंवा बेपत्ता असल्याच्या अफवा उठवून काही वर्षांनी त्यांचा ‘विषय’ कायमचा बंद केला जायचा.
आजचा समाज हा वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होत चालल्याने अशा घटनांचे प्रमाण खूपच कमी झालेले दिसतेय. कारण आमच्यासारख्या स्वयंसेवी संस्था याबाबत समाज जागृतीचं कार्य करीत आहेत. अपराध्याला शासन झालंच पाहिजे यावर आम्ही भर देतो. त्यामुळे बहुतांशी प्रकरणांत पालकांचं मतपरिवर्तन करण्यात आम्हाला चांगलंच यश मिळतंय. अशा परिस्थितीत आरूषी प्रकरणाने आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची खरोखरच झोप उडवलीय. वयात आलेल्या मुलांनी किंवा प्रौढांनी पालकांच्या मर्जीविरूद्ध प्रेमविवाह केल्यास त्यांनी तो समजून-उमजून केलाय असं आपण म्हणू शकतो. परंतु आरूषीसारख्या केवळ १३-१४ वर्षाच्या मुलीला लैंगिक संबंध, त्याचे दुष्परिणाम, प्रेमविवाह इ. गोष्टींच कितीसं ज्ञान असणार आहे? तिचं हित, अहित तिला कितीसं कळणार आहे? त्याही पुढे जाऊन आई-वडिल, घराणं, समाज यांच्या प्रतिष्ठेचं महत्व कितीसं उमजणार आहे? हे डॉक्टर पती-पत्नीला कळू नये हे दुर्दैव म्हणावं लागेल.
या प्रकरणात आरूषीचा काही दोष असलाच तर तो तिच्या पौगंडावस्थेचा म्हणावा लागेल. ज्यात भिन्नलिंगी आकर्षणाला मुलं बळी पडू शकतात. याशिवाय पुन्हा एकदा पालक आणि मुलं यांच्यातील नातेसंबंधाचा विषय ऐरणीवर आलेला आहे असं मला वाटतं. आरूषुीचे आई-वडिल दोघंही डॉक्टर असल्याने ते तिला किती वेळ द्यायचे? आरूषीच्या वाट्याला येणारं एकाकीपण कितपत सुसह्य होतं? घरातील पुरूष नोकर मुलीच्या सुरक्षिततेच्या संदर्भात कितपत विश्‍वासू होता? वयात आलेल्या मुलीला नोकराच्या भरवशावर किती काळ घरात एकटं ठेवावं? तिचे मित्र-मैत्रिण कोण कोण आहेत? बंगला, गाडी आणि आर्थिक संपन्नता यांनी मुलांवर पुरेसे आणि योग्य संस्कार होऊ शकतात का? मुळात तिचे आई-वडील हे तरी एकमेकांशी एकनिष्ठ होते का? असे अनेक प्रश्‍न आज प्रत्येक पालकासमोर आ वासून उभे आहेत.
वाचकहो, समाजातील या सर्व समस्या खरं म्हणजे आपणच निर्माण केलेल्या आहेत असं नाही वाटत तुम्हाला? समजा, आरूषी त्यांच्या नोकराच्या हव्यासाला बळी पडलेली आईवडिलांना समजलं त्यावेळी त्यांनी तातडीने त्या नोकराला कामावरून काढून टाकणं, पोलिसांत तक्रार देणं, मुलीला विश्‍वासात घेऊन तिचं समुपदेशन करणं, आईने मुलीसाठी आपला पेशा सोडणं, किंवा पार्टटाईम अथवा मुलीला सोबत घेऊन आपला व्यवसाय करणं असे कितीतरी पर्याय त्यांच्यासमोर होते. मग त्यांनी त्या दोघांना संपविण्याचा अगदी टोकाचा निर्णय का बरं घेतला असेल हे खरोखरच एक न सुटणारं कोडं म्हणावं लागेल.
आपल्या मुलांसाठीच आपण लग्न करून आपला संसार थाटतो. कुटुंब वाढवतो. मग अशाश्‍वत पैसा आणि प्रतिष्ठच्या बेगडी, खोट्या हव्यासापायी आपण आपल्या मुलांचं उज्ज्वल भवितव्य का बरं उद्ध्वस्त करावं? पैसा, प्रतिष्ठा, शील, चारित्र्य यांच्या कल्पना काळाबरोबर नको का बदलायला? आणि आपली मुलं चुकत असतील तर आपणही कुठेतरी चुकतोय, कमी पडतोय हेही विसरून चालणार नाही.
-श्रद्धा कळंबटे
संपर्क-हेल्पलाईन स्वयंसेतू-९४२२४३०३६२
Website : www.swayamsetu.org, email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it