Tuesday, Jan 23rd

Headlines:

नातेसंबंध जपताना...

E-mail Print PDF
shraddh-kalambate
4770318674986245778_org
आजच्या २१ व्या शतकात वैज्ञानिक, माहिती तंत्रज्ञानाच्या युगाने मानवाला भौतिक संपन्नता तर जरूर बहाल केलीय परंतु या समृद्धीबरोबरच ताणतणाव, विविध समस्या यांचाही वारसा जणू मानवाला लाभलाय. आज ज्या कुटुंबात जितकी संपन्नता जास्त तितकीच अशांतता, अस्थिरता, कटकटी, काळजी, चिंता यांचं साम्राज्यही विपुल! याउलट मध्यमवर्गीय आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात समस्या या प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजलेल्या!
अशा परिस्थितीत समाजामध्ये वावरत असताना आपल्याला सर्वकाही आलबेल चाललंय असं वाटत असलं तरीही प्रत्येक नातेसंबंधात काहीना काहीतरी कुरबुरी सुरू असलेल्या पहायला मिळतात. महिला व मुलांच्या विविध तक्रार निवारण समितीवर कार्य करीत असताना त्यांना समुपदेशन करीत असताना काही गोष्टी (त्रुटी) प्रकर्षाने जाणवतात. समस्याग्र्रस्तांच्या मार्गदर्शनासाठी केलेला छोटासा प्रयत्न!
पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे समस्या प्रौढांची असो वा मुलांची. ज्यावेळेस एखाद्या समस्येला सुरुवात होते त्याचवेळी आपले पालक, हितचिंतक, नातेवाईक, शेजारी किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता यापैकी जी व्यक्ती तुमच्या अधिक विश्‍वासातील असेल तिला त्या समस्येबद्दल सर्वकाही सांगा. कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका. स्वतःच्या चुकांसहित सर्व परिस्थिती प्रामाणिकपणे सांगा. तुम्हाला मार्ग निश्‍चितच सापडेल. बर्‍याच प्रमाणात आमच्या असं लक्षात येतं की समस्या उद्भवल्यानंतर ८-१० वर्षानंतर ती व्यक्ती आमच्या संपर्कात येते. त्यावेळी तिच्या आयुष्यातील महत्वाची उमेदीची वर्षे अन्याय सहन करण्यात वाया गेलेली असतात ती चूक तुमच्या हातून होऊ देवू नका.
ज्यावेळी तुम्ही एखाद्या समस्येच्या निराकरणासाठी एखादी व्यक्ती किंवा संस्था वा कायद्याचा आधार घेता त्यावेळी ८-१० वर्षातील समस्या जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे चुटकीसरशी सुटून तुमच्या मनाप्रमाणे अपेक्षित वर्तनाबद्दल घडेल या भ्रमात राहू नका. समस्या जशी लहान लहान प्रसंगातून उग्र रूप धारण करते तद्वतच त्याचं निराकारणसुद्धा टप्प्याटप्प्यानेच होणार असतं. मानवी मन म्हणजे इलेक्ट्रॉनिक बाहुली नव्हे जे चावी देताच ताळ्यावर येईल.
प्रत्येक समस्याग्रस्त व्यक्तीला समस्येचं उत्तर, समाधान ताबडतोब हवं असतं. एकाच बैठकीत कोणताही सोक्षमोक्ष लागावा अशी त्यांची इच्छा असते. तसे न झाल्यास न्यायव्यवस्थेवरचा, संबंधित व्यक्तीवरचा त्यांचा विश्‍वास डळमळीत होतो. अशा व्यक्ती निराशेच्या गर्तेत सापडून जगण्याची आशाच सोडून देतात. आपण ही चूक करू नका. परस्परांना विश्‍वासात घेण्यासाठी काही काळ जाऊ देणं हे अत्यंत गरजेचं असतं.
मुलांच्या समस्येसंदर्भात प्रत्येक मुलाला स्वतंत्र व्यक्तीमत्व असतं, त्याला काही हक्क असतात. हे समजून घेतलं पाहिजे. बहुतांशी पालक मुलांच्या समस्या गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. सुरूवातीला मूल लहान आहे म्हणून नंतर वयात येतंय म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून एकाअर्थी त्यांच्या समस्या गंभीर, जटील करण्यास कारणीभूत ठरतात. कोणतीही समस्या सोडवताना आपल्या हक्कांबरोबर कर्तव्याचीही जाणीव असू द्या. योग्य मार्गाने गेल्यास प्रत्येक समस्येला मार्ग हा असतोच.
काही प्रत्यक्ष घडलेल्या घटना आपण पाहू. ज्या कुटुंबात वडिलोपार्जित संपत्ती, घरदार, प्रॉपर्टी आलेली असते अशा कुटुंबातील तरूण पिढी ही बर्‍याचवेळा ऐतखाऊ बनते. त्यामुळे हळुहळू ही संपत्ती संपण्याच्या मार्गावर आली असता अशा व्यक्ती व्यवसनाधीन बनतात. अर्थार्जन, कष्ट करण्याची सवय नसल्याने एक वेळ अशी येते की, व्यसन, उपासमार यांनी अशा व्यक्ती मनोरूग्ण बनतात. काही व्यक्ती लांडीलबाडी करून विनासायास झटपट श्रीमंत होतात. परंतु हे तंत्र त्यांना पुढेही जपता आलं नाही तर मात्र अशांवरही कर्जबाजारी, उपासमारीची वेळ येते. अशा व्यक्तीसुद्धा मनोरूग्ण बनतात. बरं, अशा व्यक्ती जेव्हा आमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. त्यावेळी आम्ही त्यांना वेगवेगळे उत्पन्नाचे मार्ग सुचवतो. मात्र कष्ट करण्याची त्यांची बिलकुल मानसिकता नसते. कुठूनतरी आपल्याला आयतं घबाड मिळावं आणि पुन्हा आपण पूर्वीप्रमाणेच झटपट श्रीमंत होऊ हे स्वप्न काही सत्यात उतरू शकत नाही कारण समाजाने त्यांची चांगलीस पारख केलेली असते. अशी माणसं तुम्हाला कर्ज, उसनवारी करून दैनंदिन जीवन टीपटॉप जगताना दिसतील. बढाया माराव्यात, दुसर्‍यांच्या चुका दाखवण्यात ही मंडळी पटाईत असतात.
अशा वेळी त्यांना आपल्याला जर पुन्हा ‘माणसात’ आणायचे असेल तर ‘कष्ट करून भाकरी मिळवण्याचा’ मार्ग त्यांना पटवून देणं, तशी संधी त्यांना उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा मानसिकतेतून कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेली काही पाहिली आहेत.
वाचकहो, आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदायची असेल तर आपली कर्तव्य आपण सचोटीनं पाळलं पाहिजेत. यासाठी आपले परस्परांशी असलेले नातेसंबंधही प्रेम, विश्‍वास आणि अहिंसेच्या पायावर जोडलेले असले पाहिजेत. आपलं आयुष्य हे सुख-शांती, समज-गैरसमज, चढ-उतार, हेवे-दावे इत्यादीनी भरलेलं असतं. काही व्यक्ती स्वतःच्या बुद्धीचातुर्याने यावर मात करून यातून मार्ग काढतात. परंतु प्रत्येकालाच ते जमेल असं नाही. अशावेळी कुटुंबाहेरील तिसर्‍या व्यक्तीचा जरूर सल्ला घ्या. छोट्या मोठ्या आपत्तींनी डगमगू नका. तुमच्या कोणत्याही समस्या निवारणासाठी आम्ही आहोतच!
-श्रद्धा कळंबटे
संपर्क ः हेल्पलाईन स्वयंसेतू-९४२२४३०३६२
Website : www.swayamsetu.org, email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it