Monday, Jan 22nd

Headlines:

संभाव्य मासेमारी क्षेत्र आणि सागरी हवामानाचा अंदाज, कोकणातील मच्छीमारांना लाभ

E-mail Print PDF
boya1
boya_3
boya2
     भारतीय राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र (इन्कॉइस) भूविज्ञान मंत्रालय, भारत सरकार, हैद्राबाद आणि किनारपट्टी व सागरी जैविक विविधता केंद्र (सीसीएमबी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, भाट्ये, रत्नागिरी तसेच राष्ट्रीय विज्ञान समुद्र संस्थान (एन.आय.ओ.) गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे संभाव्य मासेमारी क्षेत्र व सागरी हवामानाचा अंदाजची माहिती प्रणाली बसविण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे मच्छिमारांनी समुद्रात जाऊन मासेमारी करावयाची आहे.
संभाव्य मासेमारी क्षेत्र म्हणजे काय?
      समुद्रामध्ये ज्या-ज्या ठिकाणी पाण्यातील क्षार, प्राणवायु उपलब्धता, आम्लता, तापमान इत्यादी नैसर्गिक उपयुक्त वातावरणाने हरितलवके (CHLOROPHYLL) मुबलक प्रमाणात निर्माण होतात व ते खाण्यासाठी विविध प्रकारची मासळी आकर्षित होऊन त्या क्षेत्रात एकत्र येतात, अशा ठिकाणी मासेमारी केल्यास जास्त मासळी मिळू शकते. या क्षेत्रास ‘संभाव्य मासेमारी क्षेत्र- पोटेन्शियल फिशींग झोन’ (Potential Fishing Zone- PFZ) असे म्हणतात.
महाराष्ट्राच्या सागरी किनार्‍यावरील मासेमारी केंद्राच्या समोर कोणत्या दिशेला, कोणत्या कोनात (डिग्री-अंश), किती अंतरावर (कि.मीटर), किती सागरी खोलीत (मीटर) मासळी एकत्र येण्याची शक्यता आहे, त्याची माहिती त्या-त्या ठिकाणी ‘इलेक्ट्रॉनक डिजीटल डिस्प्ले बोर्ड’ (ELECTRONIC DIGITAL DISPLAY BOARD - E.D.D.B) बसविण्यात आलेला आहे. त्यावर आठवड्यातील तीन दिवशी (सोमवार, बुधवार व शुक्रवार रोजी) दर्शविण्यात येते. संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती इंटरनेट व फॅक्सद्वारे प्राप्त होते.
संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती कशी प्राप्त होते?
    भारतीय अवकाश संशोधन संस्था (I.S.R.O.), स्पेस ऍप्लीकेशन सेंटर (SAC) यांच्या संयुक्त विद्यमाने, २६ मे १९९९ रोजी श्रीहरिकोटा येथून ‘इंडियन रिमोट सेन्सींग- पी-४ (Indian Remot Sensing (IRS) P-4- OCEAN STAT)  हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आलेला आहे. आयआरएस पी-४ हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आलेला आहे. आयआरएस पी-४ हा उपग्रह अवकाशात सोडणे व त्याद्वारे मत्स्यव्यवसाय तसेच सागरी वातावरणाची माहिती उपलब्ध करुन घेण्याचा कार्यक्रम ‘भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र’ (INDIAN NATIONAL CENTER FOR OCEAN INFORMATION SERVICES- I.N.C.O.I.S.), भू-विज्ञान मंत्रालय, भारत सरकार, हैद्राबाद यांनी कार्यान्वित केला. या संस्थेचे तत्कालीन संचालक मा.डॉ. के. राधाकृष्ण यांनी रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदरात पहिला डिजिटल डिस्प्ले बोर्ड २००२ साली बसवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत किनारपट्टी व सागरी जैविक विविधता केंद्र, भाट्ये, रत्नागिरी यांच्या विशेष प्रयत्नाने भारतातील पहिला डिजीटल डिस्प्ले बोर्ड बसविण्याचा मान रत्नागिरीस प्राप्त झालेला आहे.
     National Remote Sensing Agency (NRSA) हैद्राबाद व इतर संस्थांच्या सहकार्याने, विशिष्ट अद्ययावत व प्रगत उपकरणांचा उपयोग करुन सागरी पाण्याचे तापमान, रंग व शैवाळ यावर आधारित मत्स्यसाठा अंदाज दर्शविणारे नकाशे तयार करतात.
निरभ्र आकाश व चांगला सुर्यप्रकाश असेल, त्या-त्या वेळेस या उपग्रहाद्वारे छायाचित्रे व माहिती संकलित करण्यात येते व ती माहिती ISRO व SAC (Space Application Center) द्वारे INCOIS हैद्राबाद येथे पुरवली जाते व मच्छिमारांना उपयोगी होईल अशा प्रकारे या माहितीचे विश्‍लेषण केले जाते.
संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती कशी वाचावी?
संभाव्य मत्स्यसाठ्याची माहिती दोन पानात प्राप्त होते. पहिल्या पानास ‘टेक्स्ट मॅप’ म्हणतात. या पानावर सुरुवातीला महाराष्ट्र, त्या खाली मच्छिमारी केंद्र अथवा बंदर नमुद केलेले असते. दुसर्‍या पानास ‘क्लोरोफिल मॅप’ म्हणतात. या नकाशावरील माहिती उपग्रहाद्वारे प्राप्त वार्‍याच्या दिशेवरुन घेतलेली असते. त्याखाली अक्षांश, रेखांश, कोन, समुद्राची खोली या परिणामात विविध बंदरासमोर उपलब्ध होऊ शकणार्‍या अंदाजित मत्स्यसाठा क्षेत्राची माहिती असते. संभाव्य मत्स्यसाठा वार्‍याच्या दिशेप्रमाणे कोठून कोठे सरकेल याचीही माहिती नकाशात दर्शविण्यात येते.
उपयोग-
    आपल्या मासेमारी नौकेवरील  GPS (Global postioning system) वर ही माहिती सेट करुन त्या मासेमारी क्षेत्रात जाता येते. मत्स्यसाठा मिळण्याचे अंदाजित क्षेत्र माहिती झाल्याने मासेमारीस जाण्याचा वेळ कमी लागतो. पर्यायाने डिझेल व मनुष्यबळ यात बचत होते. मात्र काळजी ही घ्यायची आहे की, इन्कॉईसमार्फत कळविलेले मत्स्यसाठ्याचे अंदाज ३ दिवसांपर्यंतच उपयुक्त असतात. त्यानंतर सागरी लाटा, वार्‍याचा वेग, वार्‍याची दिशा व पर्यावरणीय बदल इत्यादींमुळे मत्स्यसाठा स्थलांतरीत होण्याची शक्यता असते.
इलेक्ट्रॉनिक डिजीटल डिस्प्ले बोर्डाची रचना-
     इलेक्ट्रॉनिक डिजीटल डिस्प्ले बोर्ड (EDDB) ४६ सें.मी. लांब, ५० सें.मी. उंच व १० सें.मी. रुंद आकाराचा आहे. त्याच्या आत सेंट्रल सर्व्हर हे संदेश दळण-वळणाचे उपकरण असते. या सेंट्रल सर्व्हरकडे इन्कॉईस, हैदराबाद संस्थेकडून माहिती मिळते. ही माहिती उपग्रहाद्वारे अथवा GPRS च्या माध्यमातून मिळते. या EDDB साठी २३० व्होल्टचा विद्युत पुरवठा आवश्यकतेप्रमाणे ५ व १२ व्होल्टमध्ये रुपांतरीत केला जातो. सेंट्रल सर्व्हरकडून प्राप्त माहिती या विद्युत पुरवठ्याचा उपयोग करुन LCD व LED, टी.व्ही.वर प्रदर्शित होते. या फलकावर माहिती प्रदर्शित होण्यासाठी हा बोर्ड मोबाईल फोन नेटवर्क आणि मोडेमद्वारे इंटरनेटशी जोडलेला आहे. मोडेमचा उपयोग सर्व प्रकारची माहिती मिळवण्यास करण्यात येतो. अशी माहिती मिळण्यासाठी सेंट्रल सर्व्हर मोडेमला मदत करते व फलकावर अद्ययावत माहिती दर्शवते. उपयोगात येणार्‍या इंटरनेटचा वेग ५६ 56 KBPS असतो. विद्युत पुरवठा सातत्याने होण्यासाठी २ बॅटरीज व अमेरिकन पॉवर कन्झर्व्हरची जोडणीही केलेली असते.
    भारतीय सागरी किनारा ८,११८ कि.मी. लाभलेला आहे. त्यापैकी महाराष्ट्राला ७२० कि.मी. वेढलेला आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याला सागरी किनारा १६७ कि.मी. आहे. भारताच्या लोकसंख्येच्या जवळपास ३१ टक्के सागरी किनारपट्टीवर जनतेचे वास्तव्य आहे. या देशास वेढलेल्या महासागराच्या स्थितीची माहिती देशातील सामाजिक व आर्थिक विकासासाठी तसेच प्रगतीसाठी उपयोगी होते.
     रत्नागिरी येथील लाईट हाऊसच्या समोर अक्षांश- १६.५८ ६७५ अंश उत्तर आणि रेखांश ७३.१५ ४४४ अंश पूर्व या सागरी स्थित १० जानेवारी २०१२ रोजी समुद्रात वेव्ह रायडर बोया तरंगते उपकरण जलस्थापित केले आहे. हे उपकरण १८ मीटर खोलीत बसवले आहे. त्याला खालच्या बाजुला ४०० कि.ग्रॅ.चे वजन लोखंडी प्लेट आहे व तसेच त्याला लोखंडी साखळीने बांधुन आहे म्हणून ते स्थलांतर होऊ शकत नाही. त्यावर एक अँटीना आहे. त्यावर रात्रीला सिग्नल देण्यासाठी बॅटरीजच्या सहाय्याने लाईट ब्लींकींग होत असतो आणि एक जी.पी.एस.सुध्दा बसवले आहे, जेेणेकरुन बोया अचानक स्थलांतर झालाच तर आपल्याला तो बोया कुठे आहे त्याची स्थिती समजते. ही माहिती एच.एफ. उपग्रह (Higher frequency) द्वारे तयार करुन ते इन्कॉईस, हैद्राबाद व एन.आय.ओ., गोवा येथे मिळवते व नंतर तीच माहिती सी.सी.एम.बी. भाट्ये, रत्नागिरी येथे उपलब्ध होते.
    समुद्रकिनारी राहणार्‍या जनतेस मुख्यत: मासेमारी करण्यासाठी जाणार्‍या मच्छीमारांना याचा उपयोग सागरी हवामान अंदाजाची माहिती जास्त प्रमाणात करुन घेता येते. सागरी हवामानाची माहिती म्हणचे लाटांची उंची, दिशा, वार्‍याचा वेग, त्याची दिशा व तापमान यांची माहिती उपलब्ध होत असते. हे सर्व माहिती मिळवण्याचे साधन म्हणजे वेव्ह रायडर बोया जे की, रत्नागिरीच्या सागरी क्षेत्राच्या पृष्ठभागावर जलस्थापित करण्यात आला आहे. सागरी हवामानाची स्थिती एक दिवस आधी मोबाईलवरही उपलब्ध होत असते. त्यासाठी आपला मोबाईल क्रमांक नोंद करणे आवश्यक आहे. ही माहिती समुद्र किनारपट्टीपासून २० कि.मी.पर्यंत लाटांची उंची फुटमध्ये, त्याची दिशा, हवेचा वेग व ताशी कि.मी. मध्ये व त्याची दिशा दर्शविते. तसेच सागर किनार्‍यापासून २० ते ५० कि.मी.पर्यंत लाटांची उंची फुटमध्ये व त्याची दिशा, हवेचा वेग ताशी कि.मी.मध्ये व त्याची दिशा याची माहिती दर्शवत असते.
    लाटांची उंची ६ फुटाच्या वर व वार्‍याचा वेग ताशी २५ कि.मी.च्या वर असल्यास मासेमारीस जाण्यास धोका निर्माण होऊ शकते. सध्याची रत्नागिरी जिल्ह्याची सागरी स्थिती अशी आहे. सागर किनार्‍यापासून २० कि.मी.पर्यंत लाटांची उंची १० फुट व दिशा दक्षिण- पश्‍चिम, हवेचा वेग ३२ ताशी कि.मी. व दिशा दक्षिण- पश्‍चिम आहे. सागर किनार्‍यापासून २०-५० कि.मी. लाटांची उंची १२ फुट व दिशा दक्षिण- पश्‍चिम, हवेचा वेग ३६ ताशी कि.मी. दिशा दक्षिण- पश्‍चिम आहे. तरी मच्छीमारांनी व किनारपट्टीवर राहणार्‍या जनतेने सावध रहावे.
संभाव्य माहितीच्या उपयोगासाठी मच्छीमारांनीही वेव्ह रायडर बोयापासून ५० मीटर दुरवर मासेमारी करावी, जेणेकरुन बोयाला काही धोका पोहचणार नाही याची काळजी घ्यावी, ही नम्र विनंती.
डॉ. बी. जी. भवरे
वरिष्ठ संशोधक, किनारपट्टी व सागरी जैविक विविधता केंद्र,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, भाट्ये-रत्नागिरी.
मोबा. ९४२१३१२२६२५